पुणे : पणदरे (ता. बारामती) येथे मंगळवारी (ता. १२) आयोजित ऊस विकास परिषदेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कमी खर्चात एकरी शंभर टनापेक्षा अधिक उत्पन्न मिळवण्याचा संकल्प उपस्थित शेतकऱ्यांनी केला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी कारखान्याची भूमिका मांडली. ते म्हणाले की, कमी खर्चात शंभर टनापेक्षा अधिक उत्पादन मिळण्याचा संकल्प पूर्णत्वाला येण्यासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा शेती विभाग कायम मार्गदर्शनाच्या भूमिकेत राहील.
माळेगाव कारखान्याने यंदा १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आगामी कालात सभासदांचे एकरी उसाचे उत्पन्न वाढविणे क्रमप्राप्त बनले आहे. त्यासाठी माळेगाव कारखाना प्रशासन व पणदरे पंचक्रोशी शेतकरी मंडळाने पणदरे येथे ऊस विकास परिषदेचे आयोजन केले होते. ऊस तज्ज्ञ व गन्ना मास्टरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अंकुश चोरमले, माळेगावचे मुख्य ऊस विकास अधिकारी सुरेश काळे, पणदरे शेतकरी मंडळाचे अध्यक्ष के. बी. कोकरे, रमेश गोफणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. एकरी उत्पादन वाढवण्यासाठी जमीन व्यवस्थापन, माती परीक्षण, पूर्वमशागत, पट्टा पद्धतीची सरी ऊस रोप लागवड, खत व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण मुद्यांच्या आधारे वरील तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पणदरे पंचक्रोशी शेतकरी मंडळाचे अध्यक्ष के. बी. कोकरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जे. पी. जगताप यांनी आभार मानले.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.