पुणे : दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखाना, दौंड शुगर्स आणि श्रीनाथ म्हस्कोबा कारखाना या तीन कारखान्यांनी उसाचा पहिला हप्ता २,८०० रुपये जाहीर केला आहे. त्यामुळे ऊस खरेदीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी खासगी गुऱ्हाळ चालकांनी या आठवड्यापासून प्रतिटन ४०० रुपयांनी दर वाढवत ३००० रुपये प्रतिटन दराने ऊस खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. सध्या आडसाली उसाच्या तोडण्या सुरू आहेत. गाळप हंगाम एक महिन्याने उशिरा सुरू झाल्याने तोडणीसाठी शेतकऱ्यांची धावाधाव होत आहे. खोडवा सुरू झाल्यानंतर आगामी काळात स्पर्धकांच्या तुलनेत दर न दिल्यास ऊस टंचाईच्या भीतीने कारखान्यांनी ऊस दर वाढवला. त्यानंतर गुऱ्हाळचालकांनी ऊस खरेदी दरवाढीचा निर्णय घेतला.
दौंड तालुका हा उसाचे आगर म्हणून समजला जातो. तालुक्यात ५० लाख टन ऊस उत्पादन घेतले जाते.
येथील तिन्ही कारखान्यांनी गेल्या महिन्यांत २,६०० रुपये दर जाहीर केला होता. त्यावेळी तालुक्यातील ४०० खासगी गुऱ्हाळ चालकांनी २,६०० रुपये प्रतिटन उसाची खरेदी सुरू केली. चालू वर्षी कारखान्यांनी कमी दर जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. गाळप सुरू झाल्यावर १५ दिवसांमध्ये तिन्ही कारखान्यांनी पहिला हप्ता २८०० रुपये केला. त्यामुळे नाइलाजास्तव गुऱ्हाळ चालकांनी थेट ३००० रुपयांनी ऊस खरेदी सुरू केली आहे. याबाबत शेतकरी योगेश भोसले म्हणाले की, गुऱ्हाळे व कारखान्याने ऊसाला प्रति टन ३००० दर द्यावा ही आमची मागणी होती. कारखान्यांकडून पहिला हप्ता २८०० रुपये मिळाला. एफआरपीनुसार उर्वरित रक्कम मिळणार आहे. कारखान्यांच्या कमी दरामुळे सुरुवातीला गुऱ्हाळ चालकांनीही कमी दर ठेवला. मात्र, आता३००० रुपये दर केल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.