पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या साठाव्या वार्षिक सभेत तब्बल साडेसहा तासांनंतर दोनच विषय मंजूर झाले. त्यानंतर लगेच चार विषयांना मंजुरी देण्यात आली. याशिवाय मंगल कार्यालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेत डिस्टिलरी विस्तारवाढ, शिक्षणानिधी कपात या विषयांवर चर्चा झाली सभासदांनी नफा-तोटा पत्रक, ताळेबंद या विषयांवर प्रदीर्घ चर्चा केली. पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, आगामी हंगामात गेटकेन घ्यायचा की नाही, हे सभासदांनी ठरवावे. मागील हंगामात ऊस तुटायला उशीर झाला, मात्र दर्जेदार को ८६०३२’ वाणाचा गेटकेन आल्याने उताऱ्यात वाढ मिळाली. गाळप वाढून साखर अधिक मिळाली. तोडीस विलंब झालेल्या सभासदांच्या उसाला अनुदानही दिले आहे.
सभेत सतीश काकडे यांनी, माळेगावपेक्षा उतारा, गाळप सोमेश्वर सरस असताना ६५ रुपये दर कमी कसा? अशी विचारणा केली. डिस्टिलरी आणि सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या उत्पन्नात २७ कोटी घट झाल्याबाबतही त्यांनी प्रश्न मांडले. याबाबत पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले की, “संचालक मंडळाने वस्तुस्थितीवर आधारित एएस-२ या पद्धतीने ३४८९ रुपये प्रतिक्विंटल मूल्यांकन धरले आहे. शिल्लक साखरेचे सोमेश्वरने मूल्यांकन ३४८९ रुपये प्रतिक्विंटल धरले आहे, तेच माळेगावने ३६८० धरले आहे. विस्तारकरणासाठी डिस्टिलरी व सहवीजनिर्मिती प्रकल्प कमी चालले म्हणून नफा २७ कोटी कमी दिसतो. पण मोलासेस व बगॅसमधून तीस कोटी नफा मिळाला आहे. काकडे यांनी सभेत डिस्टिलरीनंतर कारखान्यावर ४०० कोटींचे कर्ज होणार असल्याची भीती व्यक्त केली. राजेंद्र जगताप, मदन काकडे आदींनी चर्चेत भाग घेतला. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, चीफ अकाउंटंट योगीराज नांदखिले, सचिव भारत खोमणे यांनी प्रश्नांना उत्तरे दिली.