पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत डिस्टिलरी विस्तारवाढ करण्यासाठी चालू बिलातून प्रतिटन १५० रुपये दहा टक्के व्याजाने कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच डिस्टिलरीसाठी २४ कोटी रुपयांचा ठेव विमोचन निधी वर्ग करण्याचा विषय मंजूर करण्यात आला. सभेने सन २०१८-१९ या हंगामातील कपात केलेली परतीची ठेव नूतनीकरण करण्याचा ठराव सभासदांनी फेटाळला. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखालील या सभेत गेल्या हंगामातील ऊसबिलातून भागविकास निधी योजनेअंतर्गत शिक्षण निधीकपात करण्याचा विषयही एकमताने फेटाळण्यात आला.
कारखान्याची वार्षिक सभा नऊ तास सुरू राहिली. सभेत मंगल कार्यालय बांधणे, सभासदांना दिवाळीसाठी ३० किलो साखर देणे आदी विषयही मंजूर करण्यात आले. अध्यक्ष जगताप म्हणाले की, विस्तारवाढ करून कारखान्याची गाळप क्षमता साडेसात हजार टन झाली आहे. त्यासाठी ७० कोटी खर्च आला. ४९ कोटी जिल्हा बँकेचे कर्ज व २४ कोटी स्वनिधी उभारण्यात आला. यासाठी दोनशे रुपये ठेव ठेवली आहे. प्रकल्पासाठी स्वनिधी आणण्यात अडचणी आहेत. यावेळी विजयकुमार सोरटे, प्रकाश जगताप, सतीश काकडे, प्रमोद काकडे यांनी १२५ रुपये कपात व त्यावर बारा टक्के व्याज देण्याची मागणी केली. सोरटे यांनी १५० रुपयांचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार अध्यक्ष जगताप यांनी १५० रुपये कपात व जिल्हा बँकेप्रमाणे दहा टक्के व्याज मान्य केले. सभेतील चर्चेत अॅड. बाळासाहेब गायकवाड, कांचन निगडे, शिवाजी शेंडकर, शंकर दडस, विराज मदने, दत्तात्रय भोईटे, हर्षद होळकर, शिवराज चव्हाण, कांचन निगडे, दत्ता आबा चव्हाण, राजेंद्र जगताप, केतन भोसले, दिलीप खैरे, दिलीप फरांदे, बाळासाहेब गायकवाड, मदन काकडे, ज्येष्ठ सभासद विजयकुमार सोरटे, माजी सभापती प्रमोद काकडे आदींनी भाग घेतला.