पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या टाइम ऑफिसमध्ये झालेल्या गैरव्यवहार व अफरातफरप्रकरणी सोमेश्वर कारखान्याने नेमलेल्या चौकशी समितीने कामगार अधिकारी दीपक निंबाळकर आणि कर्मचारी रूपचंद साळुंखे यांना जबाबदार ठरविले आहे. चौकशीअंती या दोघांनी ५४ लाख २९ हजार रुपये आर्थिक घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. दोर्षीवर कडक कारवाई करण्यात येणार असून, फौजदारी कारवाईसुद्धा केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली. यादव यांनी यासंबंधी गुरुवारी (दि. ३) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कर्मचाऱ्यांच्या हजेरी नोंदीमध्ये संगनमताने फेरफार करत सोमेश्वर कारखान्यात हा आर्थिक घोटाळा करण्यात आला आहे. याप्रकरणी कारखान्याचे लेबर व टाइम ऑफिस विभागातील लेबर ऑफिसर, हेड टाइम कीपर, टाइम कीपर, सर्व लिपिक व कर्मचारी अशा सहा जणांचे गेल्या महिन्यात निलंबन करण्यात आले होते. कारखान्याने मेहता आणि शहा चार्टर्ड अकाउंटंट कंपनीची चौकशी समिती नेमली होती. समितीच्या वतीने सुरुवातीला १५ मार्चला चौकशी अहवाल येणार होता; मात्र सन २०१७ ते २०२५ पर्यंतची सर्व कागदपत्रे तपासण्यात आल्याने अहवाल येण्यास थोडा विलंब झाला. ३१ मार्चला चौकशी समितीने अहवाल सादर केला. यामध्ये कामगार अधिकारी दीपक निंबाळकर आणि कर्मचारी रूपचंद साळुंखे यांना आर्थिक अफरातफरीला जबाबदार धरण्यात आले आहे.
आर्थिक गैरव्यवहाराची संपूर्ण रक्कम संबंधितांकडून वसूल करून केलेल्या गैरकृत्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यादव यांनी दिली. पुढील प्रक्रियेसाठी ॲड. मंगेश चव्हाण यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, ते गुन्हे दाखल प्रक्रिया, वसुली आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. त्यासाठी त्यांना २० दिवसांचा कालावधी दिला असून, त्यानंतर ते केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कारखान्याला सादर करणार आहेत. आर्थिक भ्रष्टाचार झाल्यानंतर कारखान्याने निंबाळकर आणि साळुंके यांच्यासह अन्य चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. चौकशीअंती निंबाळकर आणि साळुंके दोषी आढळून आले आहेत. मात्र, चार निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले जाणार का? याबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीतच होईल, असेही यादव यांनी स्पष्ट केले.