पुणे : भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी किरण गुजर यांनी उमेदवारी मागे घेतली. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. कारखाना सध्या अत्यंत वाईट अवस्थेतून जात आहे. कारखान्याला पूर्ववैभव प्राप्त करून देण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्धार आहे. त्यासाठी पृथ्वीराज जाचक यांना नेतृत्वाची संधी दिली आहे. जाचक हे सक्षम नेतृत्व आहेत. त्यामुळे माघार घेतल्याचे गुजर यांनी स्पष्ट केले. गुजर यांच्यावर सर्वपक्षीय पॅनलचा समन्वय साधण्याची जबाबदारी आहे.
दरम्यान, गुजर यांच्या अर्ज माघारीमुळे राजकीय अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. बुधवारी झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत १६९ अर्ज अवैध ठरले. तर ४३१ जणांचे अर्ज वैध ठरले. यावेळी किरण गुजर यांनी सांगितले की, कारखान्याला निवडणूक प्रक्रिया परवडणारी नाही. जाचक यांच्याच हाती कारखाना द्यावा, त्यांचीच तिथे गरज आहे. हे स्पष्ट करण्याच्या भावनेतूनच माझा उमदेवारी अर्ज मागे घेतला. कारखान्यासाठी कोणाची गरज आहे याबाबत सर्वांनी विचार करावा. सभासदांना चुकीचा संदेश जाऊ नये या भावनेतून अर्ज मागे घेतला आहे.