मुंबई : महाराष्ट्र सरकार ४० कोटी रुपये खर्चून पुण्यामध्ये साखर संग्रहालय साकारण्याची तयारी सुरू केली आहे. अर्थमंत्री आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेट सादर करताना ही घोषणा केली.
पु्ण्यातील शिवाजीनगर येथील साखर संकुलात साखर संग्रहालय सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. यासाठी ४० कोटी रुपयांचा खर्च येईल. हे संग्रहालय महाराष्ट्राती साखर उद्योगासह अन्य पूरक उद्योगांमध्ये झालेल्या विकासाची माहिती देईल असे पवार यांनी सांगितले.
हे संग्रहालय कायमस्वरुपी असेल आणि महाराष्ट्रातील साखर उद्योगाने ग्रामीण अर्थव्यवस्थेत कशा प्रकारे बदल केले, रोजगार निर्मिती केली याची माहिती मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल. महाराष्ट्रात बहुसंख्य साखर कारखाने सहकार क्षेत्रातील आहेत. कालानुरुप साखर उद्योग विकसित झाला आहे. त्यातून येथील पिक पद्धतीमध्येही बदल झाला आहे. साखर संग्रहालयातून लोकांना शिक्षण मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेबाबत जागरुकताही निर्माण होईल अशी संकल्पना आहे.