पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात उसाला प्रती टन ३,५०० रुपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास सस्ते, वसंत आटोळे, सुरेश यादव, सुखदेव जाधव, उदयसिंह फडतरे, दिलीपराव खारतोडे, जगन्नाथ कुंभार, विलास शिंदे आदींनी कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांना संघटनेच्यावतीने यासंदर्भातील मागणीचे पत्र दिले. कारखाना सुरू होऊन जवळपास महिना उलटला तरी अद्याप उसाचे पहिले बिल मिळालेले नाही. याबाबतही कारखाना प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी सस्ते यांनी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास सस्ते यांनी सांगितले की, मशागतीचा वाढणारा खर्च, रासायनिक तथा सेंद्रिय खतांचे गगनाला भिडणारे दर, दुसरीकडे मजुरांची वाढलेली मजुरी यांमुळे ऊस शेती करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. मग उसाला चांगला दर मिळाला नाही तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा, तसेच मुला-मुलींच्या लग्नकार्याचा खर्च करणे मुश्कील होत आहे. ऊस पिकाचे १६ ते १८ महिन्यांनंतर मिळणारे पैसे यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कारखाना प्रशासनाने उसाला प्रती टन ३,५०० रुपये दर द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.