पुणे : माळेगाव (ता. बारामती) येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाची सांगता झाली. यंदाच्या हंगामात ज्या ऊसतोड कामगारांनी व वाहतूकदारांनी उच्चांकी ऊस वाहतूक केली. त्यामुळे त्यांचा कारखाना प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील, संचालक योगेश जगताप, तानाजी देवकाते, प्रताप आटोळे, संजय काटे, निशिकांत निकम, अविनाश राऊत, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे, सागर तावरे, शेतकी अधिकारी धनंजय लिंबोरे, जवाहर सस्ते, ज्ञानेश्वर तावरे, मधुकर फाळके, उत्तम साबळे आदी या वेळी उपस्थित होते.
उपाध्यक्ष ढवाण पाटील यांनी कारखान्याचा गाळप हंगाम व्यवस्थित पार पाडण्यासाठी ऊसतोड कामगार, वाहतूकदारांनी मोठे कष्ट घेतले आहे. तसेच श्री नीलकंठेश्वर ऊसतोडणी व वाहतूकदार संघटनेने कारखाना प्रशासनाला अधिकचे गाळप होण्यासाठी मदत केली आहे. संचालक जगताप यांनी ऊसतोड कामगार व वाहतूकदारांना यापुढे कारखाना प्रशासनाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, तर संचालक देवकाते यांनी यंदाचा गाळप हंगाम व्यवस्थित पार पाडण्यासाठी ऊसतोड कामगार व वाहतूकदारांनी केलेल्या सहकार्यामुळेच अधिकचे ऊस गाळप करू शकलो, असे सांगितले. जिल्ह्यामध्ये आपण ऊसतोड कामगार व त्यांच्या टोळ्या आणण्यासाठी किंवा पोहचविण्यासाठी ट्रक किंवा ट्रॅक्टरने जात असतो. त्या वेळी अनेक ठिकाणी पोलिस यंत्रणा तसेच आरटीओ यांचा त्रास होतो. अशावेळी कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांनी नेहमीच सहकार्य केल्याचे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सोरटे यांनी सांगितले.