पुणे : 1 ते 15 मार्च 2025 या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे पेमेंट माळेगाव कारखाना प्रशासनाने प्रतिटन ३१३२ रुपये एकरकमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले. ही रक्कम एफआरपीपेक्षा अधिक आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून ‘एफआरपी’ एकरकमी देण्याबाबतचा केलेला आदेश महाराष्ट्रात सर्वप्रथम माळेगाव कारखान्याने स्वीकारला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचे आदेश सोमवारी (ता.१७) मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. दोन टप्प्यांत एफआरपी देण्याचा २१ फेब्रुवारी २०२२ रोजीचा राज्य सरकारने काढलेला शासन आदेशही न्यायालयाने रद्द केला होता. त्या पार्श्वभूमीवर माळेगाव सहकारी साखर कारखान्याने १ ते १५ मार्चच्या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे पेमेंट प्रतिटन ३१३२ रुपये एकरकमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले, अशी माहिती अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
अॅड. जगताप म्हणाले की, माळेगाव कारखान्याने २३४ रुपये प्रतिटन उत्पादन खर्च कमी करीत सभासदांना राज्यात प्रथम क्रमांकाचा गतवर्षी ३६३६ अंतिम ऊस दर दिला. चालू हंगामातही प्रतिटन ३१३२ रुपये सर्वाधिक अॅडव्हान्स शेतकऱ्यांना दिला. जून ते जुलैमध्ये खोडकी पेमेंट प्रतिटन २०० रुपये देण्याचे नियोजन केले. साखर कामगारांना आजवर विक्रमी बोनस व रजेचा पगार दिला. हुद्देवारी दिली. शासनस्तरावर निश्चित होणारी कामगारांची वेतनवाढ विचारात घेऊन आर्थिक नियोजन केले. व्हीएसआय संस्थेने अजित दादा नेतृत्व करीत असलेल्या माळेगावला उत्कृष्ट आर्थिक नियोजनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला. अशी उत्तम आर्थिक स्थिती असताना विरोधक माळेगावची बदनामी करतात.
माळेगाव कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम १३० दिवसांचा ठरला. या कालावधीत सुमारे ११ लाख २५ हजार टन उसाचे गाळप करण्यात यश आले. त्यापैकी गेटकेनधारकांनी ३ लाख ३६ हजार ८२४ टन ऊस देऊन माळेगाव कारखान्यावर विश्वास दाखविला. त्यामध्ये ११ लाख ८१ हजार ७०० साखर पोती (अद्याप प्रोसेस चालू) निर्माण झाली आहेत. ८ कोटी ५४ लाख युनिट विजेचे उत्पादन झाले. तर इथेनॉलचेही विक्रमी उत्पन्न यंदाच्या हंगामात मिळाले, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संचालक तानाजी देवकाते, मंगेश जगताप, मदनराव देवकाते, सागर जाधव, संजय काटे, दत्तात्रेय येळे, पंकज भोसले, बन्सीलाल आटोळे, निशिगंध निकम, कार्यकारी संचालक अशोक पाटील, वित्त विभाग प्रमुख सत्यवान जगताप उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या बातम्या आणि संबंधित चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.