पुणे : वेळेत मिळाले वैद्यकीय उपचार, ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती

पुणे : डॉक्टरांकडून वेळेत मिळालेल्या वैद्यकीय उपचारांमुळे एका ऊसतोड महिलेची सुखरूप प्रसूती झाली. याला शिरसगाव काटा येथील आशा सेविकेची तत्परता आणि मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची मदत मोलाची ठरली. मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील ऊस तोडणी कुटूंबाला यामुळे मोठा आधार मिळाला. ऊसतोड मजूर उज्वला मोरे यांची सुखरुप प्रसुती झाली.

शिरसगाव फाटा येथे ऊस तोडणीसाठी हे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून येथे राहात आहे. या कुटुंबातील ऊसतोड मजूर महिला उज्ज्वला मोरे यांचे प्रसूतीचे दिवस जवळ आले होते. बुधवारी (दि. १८) पहाटे तीनच्या सुमारास उज्ज्वला यांना प्रसवकळा सुरू झाल्या. त्यामुळे कुटुंब काळजीत होते. याची माहिती मिळताच गावातील आशासेविका जयश्री गायकवाड यांनी मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ रुग्णवाहिका पाठवून उज्ज्वला यांना दवाखान्यात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांची सुखरूप प्रसूती झाली. दोन दिवसानंतर आईसह नवजात बाळाला घरी सोडण्यात आले. डॉ. नितीन फटाले, राजेंद्र काळे, उषा लाड, आशासेविका जयश्री गायकवाड, किरण गायकवाड, आशा कळसकर, जे. आर. बनसोडे, डॉ. जे. के. पावरा, किरण जगताप, विकास जगताप यांनी यासाठी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here