पुणे : ऊस लागवडीतील AI तंत्रज्ञानाच्या वापराचे मायक्रोसॉफ्ट प्रमुख सत्या नाडेला यांनी केले कौतुक

पुणे : बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर करत उसाची लागवड करण्यात आली. भविष्यातील शेती कशी असेल हे डोळ्यासमोर ठेवून येथे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शेतीचा प्रयोग करण्यात आला आहे. राज्यात १००० शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऊस पिकावर अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. याची दखल मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनी घेतली आहे. शेतीसाठी एआय तंत्रज्ञान क्रांतीकारी ठरत असल्याचे यातून सिद्ध झाले आहे.

मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नंडेला यांनी सोशल मीडियावर बारामतीच्या या एआय लागवडीबाबत पोस्ट केल्यानंतर अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे सर्वत्र कौतुक होत आहे. बारामती येथील टीमला भेटून खूप आनंद झाला, जे आमच्या एआय टूल्सचा वापर करून शेतकऱ्यांना सक्षम आणि शेतीमधील अधिक शाश्वत कापणीसाठी मदत करत आहेत, असं ट्विट सत्या नाडेला यांनी केलं. कृषी विज्ञान केंद्रामध्ये या तंत्रज्ञानाद्वारे ऊस लागवड करण्यात आली आहे.

कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश नलवडे, प्रगतशील शेतकरी सीमा चव्हाण यांनी दिल्लीमध्ये याचे सादरीकरण केले. संस्थेच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल मायक्रोसॉफ्टचे पार्टनरशिप असलेल्या संस्थेने घेतली आहे. दरम्यान, सत्या नडेला यांच्या ट्विटवर शरद पवार यांनी धन्यवाद असा ‘रिप्लाय’ दिला आहे. शेती प्रयोगात तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर केला जाईल याची खात्री देत मायक्रोसॉफ्टसोबत काम करण्यास वचनबद्ध आहोत, असंही शरद पवार यांनी नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here