पुणे : शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनीला खांबावरच्या तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्कटिने लागलेल्या आगीत नऊ एकरातील ऊस जळून खाक झाला. निंबुत (ता. बारामती) नजीक जगताप वस्ती येथे सोमवारी (दि. ४) सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. आगीत उसाबरोबर शेतातील पाच एकरावरील ड्रीपचेही नुकसान झाले आहे. सहा शेतकऱ्यांचे तब्बल दहा लाखांचे नुकसान झाले आहे.
या आगीत अनिल काकडे यांचा सात एकर, रमेश काकडे यांचा अर्धा एकर, प्रकाश जगताप, मोहन जगताप, अरुण जगताप, आनंदराव तोरवे यांचा प्रत्येकी अर्धा एकर ऊस जळून खाक झाला. तोडणीला आलेल्या उसाला लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी याबाबत महावितरण, सोमेश्वर कारखान्याला कळवले असून तलाठ्यांनी पंचनामा केला आहे. यापूर्वीही महावितरणच्या हलगर्जीपणामुळे अनेक वेळा शेतातून गेलेल्या तारांच्या घर्षणातून लागलेल्या आगीत शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.