पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय)चा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसशेती शक्य आहे, हे बारामतीच्या अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने सिद्ध केले आहे. १,००० शेतकऱ्यांच्या शेतातील उसावर हा प्रयोग करण्यात आला आहे. त्याचे चांगले परिणाम दिसले आहेत. मायक्रोसॉफ्ट, ऑक्स्फर्ड विद्यापीठ व बारामतीचे अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसशेती विकसित केली आहे. गुरुवारपासून (ता. १६) बारामतीनजीक असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्लॉटवर कृषिक २०२५’ या कृषी प्रदर्शनांतर्गत ऊस उत्पादकांना हे तंत्रज्ञान पाहता येणार आहे.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या दूरदृष्टीतून, ‘ऑक्स्फर्ड’चे संचालक डॉ. अजित जावकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारला आहे. एक हजार शेतकऱ्यांच्या शेतात ऊस शेतीमध्ये हवामान बदल, इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी), उपग्रह आधारित भौगोलिक प्रणाली (जीआयएस), मशिन लर्निंग अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात केला जात आहे. ऊस शेतीमध्ये ‘एआय’ वापरल्याने उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ आणि उत्पादन खर्चात २० ते ४० टक्क्यांची घट दिसून आली आहे. तर तीस टक्के पाण्याची बचत झाली. रासायनिक खतांच्या वापरात २५ टक्के घट असून ऊस तोडणी कार्यक्षमतेत ३५ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे. सातत्याने पीक निरीक्षणामुळे कीडकनाशकांच्या वापरात २५ टक्के बचत झाली आहे. याशिवाय जमिनीच्या सुपीकतेमध्ये वाढ झाली आहे. या तंत्रज्ञानाची पाहणी करण्याची संधी या प्रदर्शनादरम्यान मिळणार आहे.