पुणे : घोडनदी व डिंभे धरणाचा उजव्या कालव्यामुळे आंबेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. मात्र, तालुक्यात वातावरणातील बदलांमुळे ‘हुमणी’चा प्रार्दुभाव वाढू लागला आहे. यामुळे काही शेतकऱ्यांचा ११ महिन्यांचा ऊस वाळू लागला आहे. त्यामुळे जवळपास २५ ते ३० टक्के ऊसाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. यावर्षी उसाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वातावरणातील बदलांमुळे नव्याने लागवड केलेला व तोडणीला आलेला ऊस वाळू लागला आहे.
पुढील महिन्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार ऊस तोडणीस सुरुवात होईल. मात्र हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तसेच वातावरणात आर्द्रता वाढल्याने उसाचे पीक वाळत आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. नव्याने लागवड केलेल्या ऊसालाही हुमणीचा प्रार्दुभाव झाला आहे. कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांनी या भागाची पहाणी करावी. या संकटापासून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.