पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याची ९९ एकर जमीन खरेदीचा प्रस्ताव पणन संचालकांकडे

पुणे : गेल्या १३ वर्षांपासून बंद असलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्याची देणी देणे व भांडवल उभारणीसाठी स्वमालकीची ९९.२७ एकर जमीन विक्रीचा प्रस्ताव पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीस ३० ऑक्टोबर २०२४ रोजी दिला होता. कारखान्याची जुनी यंत्रसामग्री बदल, बँका व कामगारांची देणी, एनसीडीसीची मदत मिळवणे अशा स्तरावर काम सुरू आहे. बँकेकडून कर्ज अथवा कारखान्याच्या जागेची विक्री करून हा खर्च करण्यासाठी चाचपणी केली जात आहे. यासाठी झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जमिनीच्या दरासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी दिली.

कारखान्याच्या मालकीची ९९.२७ एकर जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने पणन संचालकांकडे दिला आहे. याबाबत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती, उपसभापती, संचालक, बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर, यशवंत कारखानाचे चेअरमन व व्हा. चेअरमन, संचालक व कार्यकारी संचालक कैलास झरे यांच्यात बैठक झाली. यात सकारात्मक तोडगा निघाल्याचे सांगण्यात आले. बाजार समितीने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून कोरेगांव मूळ येथील १२ एकर जमीन ५३ कोटी १७ लाख ८८ हजार ७०४ रुपयांना ७ ऑक्टोबर २०२२ रोजी खरेदी केली आहे. या जमिनीला जिल्हा उपनिबंधकांनी ५ जुलै २०२४ रोजी दुय्यम उपबाजार आवार घोषित केलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here