पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची ९९.२७ एकर जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव पणन संचालकांकडे दिला आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्याची देणी देणे व भांडवल उभारणीसाठी स्वमालकीची ९९.२७ एकर जमीन एकूण ४०० कोटी रुपयांना विक्री करण्याचा प्रस्ताव कृषी उत्पन्न बाजार समितीस ३० ऑक्टोबर रोजी दिला होता. बाजार समितीने ओव्हर ड्राफ्टवर कर्ज घेतलेल्या जमाठेवीची मुदत २२ डिसेंबरअखेर संपत आहे. शिल्लक ओव्हरड्राफ्ट कर्ज ३२,३१,०२,७८७ रुपये जमा ठेवीत समायोजित केल्यास बाजार समितीकडे १३५,४८,२८,३९९ रुपयांच्या ठेवी शिल्लक राहतील असे प्रस्तावात नमूद केले आहे.
दरम्यान, यशवंत कारखान्याच्या या जागेची किंमत सुमारे ३३५ कोटी रुपये आहे. दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळाने व शासनाच्या मान्यतेने कमी किमतीने उपबाजार आवारासाठी जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या शेतकऱ्यांना व बाजार घटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीस जागेची आवश्यकता आहे. थेऊरमधील जागा खरेदीसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून कोरेगाव मूळ येथील उपबाजाराची जागा जाहीर लिलावाने पणन संचालकांच्या कलम १२ (१) अन्वये परवानगी घेऊन विक्री करण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. ही कोरेगाव मूळ येथील १२ एकर जागा बाजार समितीने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून ५३,१७,८८,७०४ रुपयांना ७ ऑक्टोबर २०२२ रोजी खरेदी केलेली आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.