पुणे : माळेगाव (ता. बारामती) येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बारामती येथील राजेंद्र शंकरराव ढवाण-पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वीचे उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागी ढवाण-पाटील यांची निवड करण्यात आली.
संचालक मंडळाच्या शुक्रवारी (दि.२४) झालेल्या बैठकीत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी ढवाण- पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, रंजन तावरे, मावळते उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते यांच्यासह सर्व संचालक, कार्यकारी संचालक अशोक पाटील तसेच सभासद, अधिकारी, कामगार उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या हिताचे काम करणार आहे. तसेच सभासदांच्या अडचणी जाणून घेऊन त्यातून त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न राहील, असे निवडीनंतर ढवाण- पाटील यांनी सांगितले.