पुणे : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चांगला ऊस उपलब्ध असल्याने पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचा मनोदय प्रशासनाने जाहीर केला आहे. कारखान्याचा यंदाचा 27वा गाळप हंगाम आहे. कारखान्याचे मुळशी, मावळ, खेड, हवेली, शिरूर असे पाच तालुक्यांत कार्यक्षेत्र आहे. या पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्यासाठी एकूण सुमारे साडेतीनशे ते चारशे गावांमधून ऊस उपलब्ध होईल. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ५,८७० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली असल्याची नोंद कारखान्याकडे झालेली आहे.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यावर्षी मान्सूनचा चांगला पाऊस झाल्याने उसाचे पीक अतिशय चांगले आलेले आहे. त्यामुळे यंदा पाच लाख मेट्रिक टन उस गाळप होईल, असा अंदाज वर्तविला आहे. यावर्षी कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ भागवताचार्य हभप चंद्रकांत महाराज वांजळे, वैशाली चंद्रकांत वांजळे यांच्या हस्ते होईल. हभप पुरुषोत्तम महाराज मोरे इनामदार यांच्या अधिपत्याखाली हा समारंभ होत आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तसेच संचालक मंडळ आणि प्रशासन यांनी संपूर्ण नियोजन केलेले आहे.