पुणे : मुळशी, मावळ, हवेली, खेड, शिरूर या पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या मुळशी तालुक्यातील श्रीसंत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने इथेनॉल प्रकल्प उभारला आहे. केवळ अकरा महिन्यांत अनाठायी खर्चाला फाटा देत अंदाजपत्रकापेक्षा कमी किमतीत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. शुक्रवारी या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याचे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार विदुरा नवले यांनी सांगितले. उद्घाटन समारंभ वारकरी संप्रदायाचे शांतिब्रह्म मारोती महाराज कुऱ्हेकर आणि चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या हस्ते होणार आहे. इथेनॉल प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
संस्थापक अध्यक्ष विदुरा नवले यांनी सांगितले की, ४५ हजार लिटर क्षमतेचा आसवणी प्रकल्प उभारण्यासाठी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने प्रकल्प अहवाल तयार केला. या प्रकल्पाची किंमत ९२ कोटी ३२ लाख इतकी होती. प्रकल्पाचे डिस्टिलरी मशिनरी पुरवठा व इरेक्शनचे काम पुण्यातील मोज इंजिनिअरिंग सिस्टीम प्रा. लि. या कंपनीला दिले गेले. १६ टन क्षमतेच्या स्पेंट वॉश इन्सिनरेशन, बॉयलर इरेक्शनचे काम ठाण्याच्या सिटसन इंडिया लि. या कंपनीला दिले. सिव्हिल फाउंडेशनच्या कामासाठी ॲविज प्रोजेक्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. आणि तुळजाई कन्स्ट्रक्शन या कंपन्यांची नियुक्ती केली. प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ७८ कोटी रुपयांचे मध्यम मुदत कर्ज दिले. कारखान्याने स्वभाग भांडवलातून१६ कोटी रुपये उभे केले. त्यामुळे ९२ कोटी ३२ लाखांचा हा प्रकल्प ७९ कोटी ५५ लाख रुपयांमध्ये पूर्ण झाला. कारखान्याने फक्त ६४ कोटी ३३ लाख रुपयेच कर्ज घेतले.