पुणे : सोमेश्वर कारखाना स्थापनेपासून तो पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी ऊसाची कमतरता भासत होती. इतर जिल्ह्यातून गेटकेन ऊस आणावा लागत होता. परंतु, पाडेगाव संशोधन केंद्राने सन २००७ मध्ये प्रसारित केलेल्या फुले २६५ वाणामुळे आणि सन २००९-१० मध्ये कारखाना कार्यक्षेत्र व निरा नदी काठच्या चोपन जमिनीमध्ये फुले २६५ या वाणाची लागवड झाली. त्यामुळे कारखाना ऊस पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण झाला. याच अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने ऊस बियाणे विक्री व वाटपाच्या सुरु केलेल्या मोहिमेला सोमेश्वर कारखान्याने प्राधान्य दिले आहे.
सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, को-८६०३२ या वाणाचे जनक डॉ. आर. वाय. जाधव, ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांच्या हस्ते पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातील ऊस बियाणे विक्री व वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. प्रगतशील शेतकरी प्रफुल्ल जाधव, कार्तिक अडसूळ, गणपत वायाळ, रमेश काटे, राजाराम भोसले, संदीप गायकवाड यांना फुले २६५ या ऊस वाणाच्या बेणेमळ्यातील पहिली मोळी देण्यात आली. याकामी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे सहकार्य लाभले. यावेळी ऊस संशोधन केंद्रातील ऊस विशेषज्ञ डॉ. सुरज नलावडे, डॉ. सुरेश उबाळे, डॉ. कैलास काळे, डॉ. कैलास भोईटे, सोमेश्वर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, ऊस विकास अधिकारी विराज निंबाळकर, डॉ. रणजितसिंह निंबाळकर, डॉ. दत्तात्रय थोरवे, डॉ. किरणकुमार ओंबासे, डॉ. माधवी शेळके, राजेंद्र पांढरे, संतोष शिंदे, दिनेश पाटील, भाऊसाहेब बेल्हेकर यावेळी उपस्थित होते.