पुणे : बारामतीच्या ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने ऑक्स्फर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट व ॲग्रीपायलट एआय या जागतिक कीर्तीच्या कंपन्यांच्या मदतीने राज्याच्या शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात शरदचंद्र पवार आधुनिक शेती विस्तार संशोधन प्रकल्प राबवला जात आहे. हे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञान राज्याच्या ऊस शेतीसह कृषी व्यवस्थेत वापरले जावे यासाठी व्हीएसआयचे अध्यक्ष व नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आग्रही असल्याचे दिसून आले. ‘व्हीएसआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘बारामतीत एआय तंत्र बघा’ असे आवाहन कृषी विभागाचे कर्मचारी, कृषी सचिवांना केले.
याबाबत ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘एआय’साठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, “ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने होत आहे. या तंत्रामुळे ऊस शेतीतील विविध निविष्ठांचा कार्यक्षम वापर करून उसाचे उत्पन्न वाढविणे शक्य आहे. ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ मध्ये (व्हीएसआय) या संदर्भात स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचे नियोजन आहे. तसेच हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची खबरदारी घ्यावी लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, मी स्वतः कृषिमंत्री कोकाटे यांच्यासह बारामतीमधील ‘एआय’ तंत्रावर आधारित शेतीची माहिती घेतली. हे तंत्र कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त पाहावे व त्याचा ‘प्रसार होण्यासाठी प्रयत्न करावा, असा माझा आग्रह आहे. साखर कारखान्यांनी देखील बारामतीला जाऊन ‘एआय’ तंत्रज्ञान बघायला हवे, असेही ते म्हणाले.