जुन्नर : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकांच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनेलचे उमेदवार रविवारी झालेल्या मतमोजणीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यामुळे ‘विघ्नहर ‘ वर शेरकर यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. २१ पैकी १७ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. हा विजय सर्व सभासदांच्या विश्वास व सहकार्यामुळेच मिळाला आहे. पुन्हा एकदा आपण सर्वजण एकजुटीने कारखान्याच्या प्रगतीसाठी कार्य करत राहू. सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अविरत प्रयत्नशील राहणार आहे असे सत्यशील शेरकर यांनी सांगितले.
उत्पादक मतदार संघांच्या शिरोली गटाच्या तीन जागांसाठी निवडणूक झाली. एकूण ३१,८५१ मतांपैकी ३०,८५४ मते वैध ठरली. यात शिवनेर पॅनेलचे विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर (१०,४२३), सुधीर खोकराळे (१०,०५७) व संतोष खैरे (१०,०२५) मते मिळवून विजयी झाले. त्यांच्या विरोधात रहेमान इनामदार यांना अवघी (३४९) मते मिळाली. इतर मागासवर्गीय मतदार संघाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार होते. यामध्ये सुरेश गडगे (९,९२०) विजयी झाले. तर नीलेश, भुजबळ यांना अवघी २२१ व रहेमान इनामदार यांना अवघी ११६ मते मिळाली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. मतमोजणीसाठी तहसीलदार डॉ. सुनील शेळके, सचिन मुंढे, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सचिव अरुण थोरवे तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.