पुणे : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी अशी मागणी शेतकरी कृती समितीने केली आहे. यााबाबत समितीच्या वतीने छत्रपती कारखान्याच्या अध्यक्ष व संचालक मंडळाला निवेदन देण्यात आले. यात कारखान्याला सन २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाचा दुसरा हप्ता ३०० रुपये प्रतिटन देवून सभासदांची दिवाळी गोड करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले की, छत्रपती कारखान्याच्या बाबतीमध्ये दोन चुकीचे ठराव करण्यात आल्यामुळे सभासदांचे मोठे नुकसान झाले आहे. या ठरावाची माहिती योग्य वेळी दिली जाईल. सहकार खात्याच्या चुकीच्या निर्णयामुळे छत्रपतीच्या सभासदांचे नुकसान होत आहे. दरम्यान, कारखान्याला वार्षिक सर्वसाधरण सभा घेण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंतची मुदत वाढ मिळाली आहे असे सांगण्यात आले. अॅड. संभाजी काटे, दिलीप शिंदे, शिवाजी निंबाळकर, सतीश काटे, विठ्ठल पवार, रामचंद्र निंबाळकर, संतोष चव्हाण, दत्तात्रेय ढवाण, बाळासाहेब शिंदे आदींनी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांना निवेदन दिले. कार्यकारी संचालक अशोक जाधव, हनुमंत करवर उपस्थित होते. दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले की, कारखान्याने गळीत हंगामात ३,००० रुपये दर देऊन ऊस दराची कोंडी फोडली होती. सध्या कारखान्याचे बॅलन्स शीट तयार करण्याचे काम सुरू असून जो बसेल तो दर देण्याचा प्रयत्न करणार आहे. वार्षिक सभा होणारच असून, वार्षिक सभा घेण्यासाठी संचालक मंडळ टाळाटाळ करणार नाही.