पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सुरुवातीला सभासदांच्या ऊस गाळपास प्राधान्य दिले असून, स्वतःचा साडेअकरा लाख टन ऊस आणि गेटकेन दीड लाख, असे १३ लाख टनांचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याकडून दररोज ९ हजार मेट्रिक टनाने ऊस गाळप केला जात आहे. त्यामुळे कारखान्याने १५ दिवसांत सव्वा लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे. कारखान्याने आजअखेर १ लाख ३० हजार टन गाळप करत १ लाख २१ हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे.
सुरुवातीला कमी मजूर उपलब्ध असल्याने कारखान्याने सहा हजार टनाची मिल सुरू केली होती. यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने दररोज ९ हजार टन ऊस गाळप केले जात आहे. ‘सोमेश्वर’ने प्रतिकूल परिस्थितीशी झगडत पूर्ण क्षमतेने गाळप हंगाम सुरू केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कारखान्याने साखर उताऱ्यात बाजी मारली असून, ९.५४ टक्के साखर उतारा राखत जिल्ह्यात अग्रस्थान पटकावले आहे. राज्यात सध्या ऊस गाळपात बारामती अॅग्रो आणि दौंड शुगर या खासगी कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. सहकारातील अग्रेसर असलेल्या सोमेश्वर आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यांनी एक लाखाचा टप्पा पूर्ण केला आहे.