पुणे : जिल्ह्यात साखर उताऱ्यात सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने बाजी मारली असून, ११.५४ चा साखर उतारा मिळवला आहे. चालू वर्षी सोमेश्वरकडे अडसाली उसाचे क्षेत्र जास्त आहे. चालू वर्षी उसाच्या एकरी उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याने शंभर दिवसांत ८ लाख ९१ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करत १० लाख २५ हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे. आगामी काळातील पाणी टंचाई लक्षात घेता जिरायती भागातील ऊस गाळपास आणण्यास प्राधान्य दिले जात आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहे. कारखान्याकडे मुबलक यंत्रणा असल्याने क्षमतेपेक्षा जास्त दैनंदिन गाळप कारखाना करत आहे. दरम्यान, माळेगाव कारखान्याने ८ लाख ४४ हजार मे. टन गाळप करत ९ लाख ५५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन मिळवले आहे. या कारखान्याचा साखर उतारा १०.८७ टक्के आहे. तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याने ४ लाख ७९ हजार ऊस गाळप करून ४ लाख ९२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सद्यस्थितीत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सभासदांच्या उसासह गेटकेन ऊस आणण्यावर भर दिला आहे. कारखान्याने चालू हंगामात १४ लाखापेक्षा जास्त मे.टन ऊस गाळप करण्याचा निर्णय घेतला आहे.