पुणे : सोमेश्वर कारखान्याने एका दिवसात केले ९९१० टन उसाचे उच्चांकी गाळप

पुणे : येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने एक दिवसाच्या सर्वोच्च गाळपाची नोंद केली आहे. साडेसात हजार टन प्रतिदिन गाळपक्षमता असताना गुरुवारी कारखान्याने १३२ टक्के क्षमतेने ९९१० टन गाळपाचा विक्रम नोंदविला. गेल्या काही वर्षात तांत्रिक क्षमता सुधारल्याने आणि आधुनिक पध्दतीचे बॉयलर बसविल्याने हे यश मिळू शकले आहे. दरम्यान, कारखान्याने २७ दिवसांत २ लाख २४ हजार टन गाळपाचा टप्पा ओलांडला आहे.

१९६३ साली १२५० टन प्रतिदिन क्षमतेने सोमेश्वर कारखान्याने गाळप सुरू केले होते. १९९२ मध्ये २५०० टनांचे तर २००८-०९ मध्ये पाच हजार टनांची क्षमता झाली. २०२३-२४ या हंगामात तिसरे विस्तारीकरण पूर्ण होऊन क्षमता साडेसात हजार टन प्रतिदिन झाली शंभर टनी कंडन्सिंग रूटचा बॉयलर, ऐशी टनांचे जुने तीन बॉयलर अशी रचना होती. चालू हंगामात जुने बॉयलर काढून शंभर टनी बँक प्रेशर बॉयलर आणि आधीचा शंभर टनी कंडेन्सिंग रूटचा बॉयलर अशी आधुनिक यंत्रणा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे साडेसात हजार टनी असूनही कारखाना नऊ हजारांच्या पुढे दैनंदिन गाळप करत आहे. गुरुवारी कारखान्याने ऊस पुरवठा अधिकाधिक वाढविल्याने चोवीस तासात ९ हजार ९१० टन गाळपाचा टप्पा गाठला, असे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे यांनी सांगितले.

कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले कि, अजूनही साडेअकरा टक्क्यांपर्यंत साखर उतारा असल्याने पुढे बॅगींगचे व्यवस्थापन जमेल अशी खात्री होती. त्यामुळे अधिक यंत्रणा लावून मिलला ऊसपुरवठा वाढविला. तोडणी यंत्रणेकडूनही जादा ऊस उपलब्ध होत आहे. दोन आधुनिक बॉयलरमुळे वीस टन स्टीम अधिकची मिळाल्याने उच्चांक गाठला. शिवाय बगॅसबचत चार टक्क्यांपर्यंत होती ती साडेपाच ते सहा टक्क्यांपर्यंत पोचून सभासदांच्या उत्पन्नात भर पडणार आहे.

सोमेश्वरने २ लाख २४ हजार टन गाळप करत सरासरी १०.१४ टक्के साखर उताऱ्याने २ लाख २६ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. वीजनिर्मिती १ कोटी ४७ लाख युनिट करून ७ लाख ९४ हजार युनिट वीज निर्यात केली आहे. डिस्टिलरीतून ११ लाख लिटर अल्कोहोलनिर्मिती केली आहे. दरम्यान, हंगामाच्या सुरुवातीलाच आठ हजार टन बी हेवी मोलासेसची निर्मिती केली असून त्यापासून तीस लाख लिटर इथेनॉलनिर्मिती होईल. पेट्रोल कंपन्यांशी २५ लाख ५० हजार लिटर पुरवठ्याचा करार केला आहे. याशिवाय सी हेवी मोलासेसपासून ईएनए व आरएसची पन्नास लाख लिटरची निर्मिती होईल, अशी माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here