पुणे : सोमेश्वर कारखान्याची वीज निर्यात झाली दुप्पट, शेतकऱ्यांना होणार फायदा

पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाची १८ मेगावॉटहून प्रतिदिन ३६ मेगावॉट विस्तारवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कारखाना दररोज १२ मेगावॉटऐवजी तब्बल २४ मेगावॉट वीज महावितरणला निर्यात करणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना ऊस दराच्या माध्यमातून होऊ शकेल. ‘सोमेश्वर’ने १०० टनी व ८७ केजी प्रेशरचा बॉयलर आणि कन्डेसिंग रूटचे टर्बाईन उभारून १८ मेगावॅट क्षमतेचा सहवीजनिर्मिती सन २०१० मध्ये उभारला होता. गतहंगामात कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ५००० टन प्रतिदिनाहून ७५०० प्रतिदिन करण्यात आली. यासाठी आणखी एक शंभर टनी बॉयलरची उभारणी करण्यात आली. त्यालाच नव्याने बॅक प्रेशर रूटचे टर्बाईन जोडून आणखी १८ मेगावॅट वीजनिर्मितीची सुरवात करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैयक्तिक लक्ष दिल्याने या प्रकल्पाचे पर्यावरण प्रमाणपत्र नुकतेच कारखान्याला मिळाले. ११५ कोटींचे हे सहवीजनिर्मितीचे विस्तारीकरण हंगाम सुरू होताना पूर्ण झाले होते, परंतु शासनाच्या समितीकडून पर्यावरण प्रमाणपत्र रखडले होते. वीज कंपनीने गुरुवारपासून येथून प्रत्यक्ष वीज खरेदी करण्यास सुरुवात केली. १८ डिसेंबरला सरकारकडून पर्यावरण प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. १६ जानेवारी रोजी शंभर टनी बॉयलर आणि १८ मेगावॅटचे टर्बाईन सुरू करून वीज कंपनीचे अधिक्षक अभियंता दीपक लहामगे व सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते वीजनिर्यातीचा प्रारंभ करण्यात आला. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक जितेंद्र निगडे, हरिभाऊ भोंडवे, ऋषी गायकवाड, किसन तांबे,कालिदास निकम, एस. एस. गावडे उपस्थित होते.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here