पुणे: येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पास ‘को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया’च्या वतीने देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा ‘बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लांट’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सलग तीन वर्षे शंभर टक्के क्षमतेने सहवीजनिर्मिती केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे.सोमेश्वर कारखान्यात ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालील शहाजीराव काकडे यांच्या संचालक मंडळाने सन २०१०मध्ये कंडेन्सिंग रूटचा हाय प्रेशर बॉयलर आणि १८ मेगावॉटचे टर्बाईन वापरून सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू केला.
गेली चौदा वर्षे हा प्रकल्प सभासदांना नफा मिळवून देत आहे. विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गेली तीन वर्षे सदर प्रकल्प हंगाम सुरू झाल्यापासून संपेपर्यंत कुठल्याही चढ-उताराशिवाय सर्वोच्च क्षमतेने चालला. दररोज ११ मेगावॉट वीज निर्यात केली. प्रकल्पाने सभासदांना २०२१-२२ हंगामात २७ कोटी, २०२२- २३ हंगामात २५ कोटी, तर दर कमी झाल्यानंतरही २०२३-२४ हंगामात १४ कोटी रुपये नफा मिळवून दिला आहे. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव व सहवीजनिर्मिती व्यवस्थापक एस. एस. गावडे हे प्रकल्पाचे दैनंदिन कामकाज पाहत आहेत.
प्रकल्पास देशातील सर्व प्रकारच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांतून प्रथम क्रमांक मिळाला आहे. यासोबत पोन्नी शुगर (तमिळनाडू), ईआयडी पॅरी (कर्नाटक) यांच्या प्रकल्पांनाही पहिले स्थान मिळाले आहे. राजारामबापू पाटील, गंगाखेड शुगर (दोन्ही महाराष्ट्र) यांना दुसरे, तर गोदावरी बायोरिफायनरी (कर्नाटक) व सहकारमहर्षी (अकलूज) यांना तिसरे स्थान मिळाले आहे.