पुणे : सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५चा गळीत हंगाम रविवारी (दि. ३०) बंद झाला. हा हंगाम चालू वर्षी साडेचार महिन्यांतच बंद झाला. संपूर्ण उसाचे गाळप झाल्यानंतरच कारखाना प्रशासनाने हंगाम बंद करण्याचा निर्णय घेतला. कारखान्याने चालू हंगामात उच्चांकी १२ लाख २५ हजार टन ऊस गाळप केला आहे. सरासरी साखर उतारा, उपपदार्थ व साखरेचे उत्पादन याबाबत अंतिम आकडेवारी हाती येण्यास अजून २ दिवसांचा कालावधी जाणार आहे. हंगाम संपल्यानंतर ऊसतोडणी कामगारांनी गुलालाची उधळण करीत
सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम बंद झाल्यानंतर कामगारांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. ४ तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू झाला होता. गुढीपाडवा हा सण आपल्या पालावरच साजरा केल्यानंतर ऊस कामगार आता पुढील २ दिवसांत आपल्या गावी परतणार आहेत. सभासद, संचालक मंडळ, ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी कामगार यांच्या सहकार्याने गाळप हंगामाची यशस्वी सांगता झाली.