पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याने गेल्या ७४ दिवसांमध्ये ६ लाख ७५ हजार टन गाळप केले आहे. कारखान्याने पावणेसात लाख टन ऊस गाळपाचा टप्पा ओलांडला असून सरासरी साखर उतारा ११.३४ टक्के आहे. कारखान्याने ७ लाख ६३ हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. कारखान्याची गाळप क्षमता ७,५०० टन प्रतिदिन असतानाही ९,१३४ टन असे उच्चांकी सरासरीने गाळप सुरू आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले. उच्चांकी ऊस दराची परंपरा यंदाही कायम राहील, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष जगताप यांनी सांगितले की, कारखान्याने सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून ४ लाख ४९ हजार युनिट्सची वीजनिर्मिती केली असून २ लाख ४८ हजार विक्री केलेली आहे. डिस्टिलरी प्रकल्पातून ३३ लाख ४० हजार लिटर अल्कोहोल व २० लाख ९३ हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याकडील उसाचे गाळप वीस मार्चपर्यंत पूर्ण होईल. हंगाम केवळ दीड महिना उरला आहे. दरम्यान सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंदविलेला ऊस जर बाहेरील कारखान्यास घातला तर संबंधितांची सवलतीची साखर १ एप्रिल २०२५ पासून बंद करणार आहोत. कारखाना दिवाळीला अंतिम बिल अनेक वर्ष उच्चांकी देत असून तशीच परंपरा या हंगामातही कायम राखणार आहोत. २८०० रुपये प्रतिटनप्रमाणे सभासदांना ऊस बिले दिली आहेत, असे ते म्हणाले.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.