पुणे : सहकार भारतीतर्फे आयोजित एकदिवसीय साखर कारखाना कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: सहकार भारतीच्या पुणे विभागातर्फे आयोजित एकदिवसीय साखर कारखाना कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात राज्याचे माजी साखर आयुक्त तथा ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी ‘साखर कारखाना सक्षमीकरण-धोरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी साखर कारखाने सक्षम होण्यासाठी अपेक्षित धोरण, आजची परिस्थिती व त्याअनुषंगाने कारखान्यांनी करावयाच्या उपाययोजना यावर सविस्तर विवेचन केले.

दुसऱ्या सत्रात साखर सह-संचालक तथा ,महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांचे ‘साखर कारखान्यांचे व्यावसायिक व्यवस्थापन. या विषयावर अभ्यासपूर्ण सत्र झाले. या सत्रात त्यांनी कारखान्यांनी उपलब्ध साधन-सामग्रीमधून व्यवसायिकता कशी जोपासावी यावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात ‘मुक्त संवाद’ आयोजित करण्यात आला होता. हे सत्र राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे (नवी दिल्ली) कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी घेतले. या सत्रात उपस्थित संचालक प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे नाईकनवरे यांनी शंका-समाधान केले.

कार्यशाळेच्या समारोपास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. पाटील यांनी सरकारी धोरण, साखर कारखान्यांची सद्यस्थिती, कारखाने अडचणीत येण्याची कारणे, राष्ट्रीय महासंघाकडून अपेक्षा अशा बहुविध विषयांवर आपली परखड मते मांडली. या कार्यक्रमात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने महाराष्ट्रातील ज्या १०कारखान्यांना पारितोषिक जाहीर केले आहे, त्यापैकी उपस्थित ८ कारखान्यांचा सन्मान करण्यात आला. सहकारभारती साखर कारखाना प्रकोष्ठच्या या पहिल्याच प्रयत्नात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहकारी-खासगी मिळून ३२ साखर कारखान्यांचे तब्बल १०४ संचालक प्रतिनिधींनी या कार्यशाळेस उपस्थिती लावली.

कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहकार व वस्त्रोद्योग मंत्री तथा आमदार प्रकाश आवाडे, सहकारभारती महाराष्ट्र प्रदेश संघटन प्रमुख तथा अधिसभा सदस्य संजय परमणे, शंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, नवयुग ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक साहेबराव खामकर, महाराष्ट्र राज्य पतसंस्था नियामक मंडळाचे माजी सदस्य, सहकारभारती पुणे महानगरअध्यक्ष तसेच उद्यम सहकारी बँकेचे अध्यक्ष CA दिनेश गांधी आणि सहकारभारती महाराष्ट्र प्रदेश सह-कोष प्रमुख औदुंबर नाईक उपस्थित होते. डॉ.हापसे यांनी सूत्रसंचालन केले. CA वसंतराव गुंड, सहकारभारती पुणे महानगर महामंत्री तथा अध्यक्ष रुक्मिणी सहकारी बँक (श्रीगोंदा) यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. औदुंबर नाईक यांनी आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here