पुणे : पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने हंगामात साखर कारखान्याचे सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. कारखान्याने गेल्या ४३ दिवसांत २ लाख टन ऊस गाळप केले आहे. चालू साखर उतारा ११.८५ टक्के आहे. हंगामातील सरासरी साखर उतारा ११.०६ टक्के आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी दिली. यंदा कारखान्याचे दैनंदिन ऊस गाळप ५ हजार टन होत आहे. पुढील वर्षी कारखान्याची ऊस गाळप क्षमता वाढविण्याचा कारखान्याचा मानस आहे. कारखान्याने पहिल्या पंधरवड्यात आलेल्या उसास उचल म्हणून प्रती टन २६०० रुपये बिल अदा केले आहे. परिसरातील इतर कारखान्यांच्या तुलनेत आपल्या कारखान्याचा उसाचा पहिला हप्ता बरोबरीने राहणार आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
अध्यक्ष राऊत यांनी सांगितले की, ऊसाची नोंद व क्रमवारीनुसार उसाची तोडणी व्हावी याकरीता कारखान्याने मोबाइल अॅप तयार केले आहे. त्याप्रमाणे तोडणी प्रोग्राम करून उसाची तोड केली जात आहे. उसाचे वजन अचूक व्हावे याकरिता वजनकाटे शासनाकडून स्टॅम्पिंग करून घेतले जातात. वजन काट्यावर उसाचे वजन हे मनुष्य विरहित पद्धतीने होते. ऊस घेऊन येणाऱ्या वाहतुकदारांना वजनासाठी स्मार्ट कार्ड दिलेले आहेत. कारखान्यावर स्मार्ट कार्डद्वारे वाहन आल्याची नोंद नंबर टेकरकडे करून ऊस खाली केला जातो. मनुष्यविरहीत ऊस वजन ईआरपी प्रणालीद्वारे करणाऱ्या मोजक्याच कारखान्यांपैकी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना एक आहे. त्यात मानवी हस्तक्षेपास वाव नाही.