पुणे : दौंड तालुक्यातील पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. केंद्र शासनाने निर्गमीत केलेल्या परिपत्रकानुसार देशभर ‘स्वच्छता पंधरवडा-२०२५’ स्वच्छता मोहिम राबविले आहे. त्याच अनुषंगाने श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात स्वच्छता पंधरवडा मोहिम राबविण्यात आली आहे. कारखान्यातील सर्व विभाग, परिसर, रस्ते, कार्यालये व कर्मचारी वसाहतमध्ये स्वच्छता व साफ-सफाई करण्यात आली आहे.
ठिकठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे फलक, पोस्टर, पोम्प्लेट लावण्यात आले आहेत. कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली. कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर म्हणाले की, स्वच्छतेमुळे अनेक साथीच्या रोगांना आळा बसतो. डासांची निर्मिती थांबते. स्वच्छतेबरोबर समृद्धि येत असल्याचे त्यांनी सांगितले.