पुणे : पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने या हंगामामध्ये कारखान्याने ११७दिवसांमध्ये पाच लाख ३४ हजार ६५८ टन ऊस गाळप करून तीन लाख १८ हजार ३८५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखर उतारा ११.५५ टक्के मिळाला, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी दिली. कारखान्याचा या वर्षीचा ऊस गळीत हंगाम सुमारे १५ दिवस ते १ महिना उशिरा चालू झाला. गळीत हंगाम २०२४-२५ साठी कारखान्याकडे ९४०० हेक्टर उसाच्या नोंदी झालेल्या होत्या. यामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील दौंड, शिरूर, हवेली आणि खेड या तालुक्यामधील सात गटामधील सुमारे १४० गावांमधून कारखान्यास ऊस गाळपास आला होता.
फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत गाळप झालेल्या उसास प्रथम हप्ता म्हणून प्रतिटन २८०० रुपयांप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना अदा केले आहेत. तसेच, एफआरपी निश्चित झाल्यानंतर उर्वरित रक्कमही शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी दिली. ऊस गळीत हंगाम २०२४-२५ करिता नोंद केलेल्या सर्व उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने करून त्याकरिता २०० वाहनटोळी, १८० ट्रॅक्टरगाडी, ३०० बैल टायरगाडी व २ हार्वेस्टर याप्रकारे ऊस तोडणी यंत्रणा भरती करण्यात आली होती. त्यानुसार ऊस तोडणी कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले होते.
कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर म्हणाले कि, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती केली आहे. पुढील हंगाम २०२५-२६ साठी कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कामे सुरू केलेली असून ५० टक्के कामे याच हंगामात झालेली आहेत. गाळप क्षमतेत वाढ झाल्यावर कारखान्याकडे नोंद असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप करता येईल. पुढील हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असणार आहे. त्यामुळे ऊस लागवडीची नोंद लागवड झाल्याबरोबर त्वरित कारखान्याकडे करावी.