पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या ५५ दिवसांत १४ साखर कारखान्यांनी ५२ लाख ४७ हजार टन उसाचे गाळप करून असून ४ लाख ५३ हजार टन साखर उत्पादन घेतले आहे. या चौदा कारखान्यांनी आतापर्यंत चाळीस टक्के ऊस संपविला आहे. दिलासादायक बाब म्हणजे साखर उतारा ८.६५ टक्के म्हणजे अर्धा टक्कांनी वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५२ लाख ४७ हजार ३५५ मे. टन ऊस गाळप झाले आहे. त्यापासून ४५ लाख ३७ हजार १२९ क्विंटल साखर उत्पादन घेण्यात आले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ९.९२ टक्के इतका आहे. शेतकऱ्यांना कारखान्यांकडून प्रतिटन तीन हजार रुपयांपेक्षा अधिकच्या एफआरपीची अपेक्षा आहे.
जिल्ह्यात साखर उताऱ्यात सोमेश्वर कारखान्याने १०.९१ टक्के गाठून पुन्हा पहिले स्थान पटकावले आहे. तर संत तुकाराम कारखाना १०.६७ टक्के उतारा मिळवून दुसऱ्या स्थानी आहे. दरवर्षीप्रमाणे गाळपात खासगी तर साखर उताऱ्यात सहकारी कारखान्यांनी बाजी मारली आहे. गाळपात बारामती ॲग्रोने दहा लाखांचा, तर दौंड शुगरने नऊ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. पाठोपाठ सोमेश्वर व माळेगाव कारखान्यांनीही साडेचार लाखांचा टप्पा ओलांडला आहे, तर भीमाशंकर चार लाखांपर्यंत पोचला आहे. सहकारी कारखान्यांचा सरासरी उतारा १० टक्क्यांजवळ जाऊन पोचला आहे. सोमेश्वर, संत तुकाराम, माळेगाव, भीमाशंकर, विघ्नहर या पाच कारखान्यांचा उतारा अत्यंत समाधानकारक आहे. त्यामुळे हंगामाअखेर या सहकारी कारखान्यांची अंतिम एफआरपी अधिक राहणार आहे. काही कारखान्यांनी उसाच्या रसापासून इथेनॉल बनविल्याने तर काहींनी बी हेवीपासून इथेनॉल बनविल्याने साखर उताऱ्यात तात्पुरती घट दिसत आहे.