पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून शुक्रवारी ४३ कोटींची ऊस बिले सभासदांच्या खात्यांवर वर्ग केली जात आहेत. उच्च न्यायालयाच्या एकरकमी एफआरपी देण्याच्या आदेशानुसार ‘सोमेश्वर’ची एकूण एफआरपी ३१७३ रुपये प्रतिटन होत आहे. कारखान्याने पहिली उचल २८०० रुपये प्रतिटन सभासदांच्या खात्यावर आधीच वर्ग केली आहे. आता उर्वरित ३७३ रुपये प्रतिटनांप्रमाणे सभासदांच्या खात्यावर ३७ कोटी १७ लाख रुपये वर्ग केले जाणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. हंगाम संपण्याआधी एफआरपी पूर्ण करणारा सोमेश्वर हा राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे.
अध्यक्ष जगताप यांनी सांगितले की, ऊस उत्पादकांना सोसायटी, बँका, पतसंस्था यांचे कर्ज भरता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्चअखेर कर्जाचे हप्ते गेल्यास शून्य टक्के व्याज दराचा लाभ शेतकऱ्यांना होतो. या हेतूने तातडीने रकमा पाठवत आहोत. ३० मार्चला सोमेश्वर कारखान्याचे गाळप पूर्ण संपणार आहे. आजअखेर १२ लाख १० हजार गाळप पूर्ण केले असून, हंगामाअखेर १२ लाख २२ हजार टनाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. दरम्यान, १६ मार्च ते ३१ मार्च कालावधीत तुटलेल्या उसाचे बिल नियमाप्रमाणे १० एप्रिलला सभासदांना प्रतिटन ३१७३ रुपयांप्रमाणे एकरकमी मिळणार आहे.