पुणे : इंदापूर तालुक्यात रुई गावच्या हद्दीत दोन शेतकऱ्यांचा प्रत्येकी पाच एकर असा सुमारे १० एकर तोडणीस आलेला ऊस जळून खाक झाला. बुधवारी (ता. ६) दुपारी साडेबारा वाजता उसाला आग लागल्याचे लक्षात आले. ऊस विझविण्यासाठी काहीच यंत्रणा उपलब्ध न झाल्याने, डोळ्यांदेखत ऊस जळताना पाहून शेतकऱ्यांच्या अश्रूचा बांध फुटला. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी गेल्यावर त्यांना तलाठ्यांचा पंचनामा आणण्याचा सल्ला देण्यात आला. या आगीमुळे शेतकऱ्यांचे सुमारे ३५ ते ४० लाखांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
उसाच्या शेतापासून विद्युत ताराही गेलेल्या नाहीत. यामुळे उसाला जाणीवपूर्वक अज्ञाताने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वाऱ्यामुळे आगीने काही वेळात रौद्र रुप धारण केले. यामुळे संदीप विनायक लावंड व सायबू वाघमोडे या दोन्ही शेतकऱ्यांचा १० एकर ऊस जळून खाक झाला. वाघमोडे यांच्या उसाच्या शेतातील ठिबक सिंचनाच्या पाइपही जळून गेल्या. यंदा कारखाना सुरू झाल्यानंतर सुरवातीलाच ऊस कारखान्याला गाळपासाठी गेला असता. मात्र सध्या कारखाने अद्याप सुरू नाहीत.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.