पुणे : इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. साखर कारखान्यासाठी दि. ७ एप्रिलपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत असून १८ मे रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. दुसऱ्या दिवशी, दि. १९ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे.
श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक २१ जागांसाठी होत आहे. यामध्ये लासुर्णे, सणसर, उद्धट या गटांतून प्रत्येकी दोन जागा, अंथुर्णे, सोनगाव आणि गुणवडीमधून प्रत्येकी तीन निवडल्या जातील. ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास यांमधून प्रत्येकी एक जागा आणि महिला राखीव गटातून दोन जागा निवडल्या जातील. ७ ते १५ एप्रिल या कालावधीत अर्ज वाटप व दाखल करण्याची मुदत आहे. दाखल अर्जांची छाननी १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता केली जाईल. वैध नामनिर्देशनाची यादी १७ एप्रिल रोजी प्रसिद्ध होईल. तर २ मेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी पाच मे रोजी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना चिन्हे वाट होईल.