पुणे : साखर कारखान्यांतील कामगिरीचे प्रतिबिंब उमटले विधानसभा निवडणुकीत !

पुणे : पुणे हा सहकार क्षेत्रातील दिग्गजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. यंदा साखर कारखान्यांतील कामगिरीचे प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीवर उमटल्याचे चित्र आहे. साखरपट्ट्यातील प्रत्येक मतदारसंघाची कारणे वेगळी असली, तरी या प्रस्थापितांना सर्व गोष्टींची अनुकूलता असतानाही यश खेचून आणण्यात अपयश आले आहे. प्रस्थापितांना मतदारांनी धोबीपछाड दिला. या अपयशामुळे संबंधित पराभूत उमेदवारांची राजकारण व सहकारावरील पकड ढिली होऊ शकते. या स्थितीला उपमुख्यमंत्री अजित पवार (बारामती), आमदार राहुल कुल (दौंड) व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (आंबेगाव) अपवाद ठरले आहेत.

भीमा पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार राहुल कुल यांनी बंद पडलेला भीमा कारखाना चालू केला अन् सभासदांनी विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांच्या कामाची पावती दिली. पुणे जिल्हा बँकेवर ४० वर्षे संचालक असलेले रमेश थोरात यांना कुल यांनी चितपट केले आहे. इंदापूरमध्ये राष्ट्रीय सहकार साखर संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पराभव करत हॅट्ट्रीक साधली. नीरा भीमा व कर्मयोगी साखर कारखान्यांच्या सभासदांची नाराजी पाटील यांना भोवली.

जुन्नरमध्ये महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सत्यशील शेरकर हे विघ्नहर साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. बारामतीतून पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार योगेंद्र पवार हे शरयू साखर कारखान्याचे (फलटण) व्यवस्थापकीय संचालक आहेत. मावळमध्ये बंडखोरी करणारे अपक्ष बापू भेगडे हे संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. येथे राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांचा विजय झाला आहे. भोरमधील राजगड साखर कारखाना बंद असल्याची नाराजी अध्यक्ष संग्राम थोपटे यांना भोवली. तसाच ‘घोडगंगा’ कारखाना बंद असल्याचा फटका अशोक पवार यांना बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here