पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ही निवडणूक आता राज्याचे लक्ष वेधून घेणार आहे. लवकरात लवकर निवडणूक घेण्याचा आदेश पुणे विभागाच्या प्रादेशिक सहसंचालकांनी निवडणूक अधिकारी तथा प्रांत अधिकारी वैभव नावडकर यांना पत्राद्वारे दिला आहे. त्यामुळे आगामी काळात कारखान्याच्या निवडणुकीचे रणांगण चांगलेच तापणार आहे.
माळेगाव कारखान्यासंदर्भात निवडणुकीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. ती याचिका निकाली निघाली आहे. कारखान्याच्या निवडणुकीबाबत अजित पवार गट आणि सहकारातील ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांची भूमिका काय असेल याची उत्सुकता सर्वांना आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी अजित पवार गटाने गेल्या महिन्यात ३ मार्चपासून आठवडाभर कार्यक्षेत्र पिंजून काढले. माळेगाव, पणदरे, सांगवी, खांडज- शिरवली, नीरा वागज, बारामती या सहा गटांमध्ये सभा घेण्यात आल्या. आता निवडणुकीचे आदेश येऊन थडकल्याने इच्छुक पुन्हा रिचार्ज झाले आहेत. तर शरद पवार गट कोणती भूमिका घेणार याचीही उत्सुकता सर्वांना असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर होत असलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.