पुणे : ऊस तोडण्यासाठी कामगार देण्याच्या आमिषाने वाहतूक कंत्राटदाराची ११ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मांडवगण फराटा येथील ऊस वाहतूक कंत्राटदार दत्तात्रय शहाजी फराटे (वय ३७) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित गोकुळ चतू पवार, चतू तोताराम पवार आणि अशोक चतू पवार (सर्व रा. नागद-सोनवडी, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. कारखान्याचा गाळप हंगाम संपला, तरीदेखील कामगार उपलब्ध करून दिले नाहीत असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील एका खासगी साखर कारखान्यासोबत दत्तात्रय फराटे यांनी ऊस वाहतूक करार केला होता. त्यामुळे त्यांना ऊसतोडणी कामगारांची आवश्यकता होती. गोकुळ पवार हा फराटे यांच्या ओळखीचा ऊसतोडणी मुकादम असल्यामुळे त्याने फराटे यांना ऊस तोडणी मजूर उपलब्ध करून देतो, असे सांगितले. फराटे यांनी मे ते नोव्हेंबर २०२४ यांदरम्यान गोकुळ पवार, चतू पवार आणि अशोक पवार यांना ऊसतोडणी कामगार देण्यासाठी ११ लाख ९ हजार रुपये ऑनलाइन व बँकेतून आरटीजीएस करून दिले. परंतु, संबंधितांनी ऊसतोडणी कामगार उपलब्ध करून दिले नाहीत व पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फराटे यांनी संशयितांविरोधात तक्रार दाखल केली.