पुणे : छत्रपती साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते पृथ्वीराज जाचक यांच्याशी समझोता करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय मेळाव्याला हजेरी लावली आणि पुढील पाच वर्षे पृथ्वीराज जाचक हे छत्रपती कारखान्याचे नेतृत्व करतील, असे जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आता छत्रपती कारखान्याप्रमाणे माळेगाव कारखान्यातही राजकीय मनोमिलन एक्सप्रेस धावणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्यात पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने जी तडजोडीची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. ती माळेगाव कारखान्यात घेतील का? तसे झाले तर पवार आणि पारंपरिक विरोधक चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्यात मनोमीलन होण्याची शक्यता आहे. रंजन तावरे यांनी मात्र सध्यातरी तडजोडीवर चर्चा नाही. आमची बांधीलकी शेतकऱ्यांशी आणि ऊस दराशी आहे, अशा शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
छत्रपती (ता. इंदापूर), माळेगाव आणि सोमेश्वर (ता. बारामती) सहकारी साखर कारखाने हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. सध्याला छत्रपती कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक शासनस्तरावर जाहीर झाली आहे. माळेगावचा निवडणूक कार्यक्रम तयार करण्याचे आदेश प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना निवडणूक प्राधिकरण विभागाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रात निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहे.
माळेगावच्या प्रशासनाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दैनंदिन कामकाज उत्तम केलेच, शिवाय राज्यात प्रथम क्रमांकाचा ऊस दर शेतकऱ्यांना दिला. त्यामुळे माळेगावचा सुमारे २० हजार सभासद पवार यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील. शेवटी आपल्या नेत्याने कोणताही निर्णय घेतला, तरी त्या विचाराशी बांधील राहून राजकारणात काम करायचे असते, अशा शब्दात संचालक अनिल तावरे, योगेश जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली