पुणे : बारामती येथे शनिवारी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा भरघोस ऊस उत्पादनाची किमया व साखर उद्योगाचे आधुनिकरणासाठी वापर’ या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त व सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पुढाकारातून ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन राज्यातील सर्व प्रमुख सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना कार्यशाळेसाठी निमंत्रित केले आहे.
कृषी विज्ञान केंद्रात शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून साडेअकरापर्यंत प्रात्यक्षिक पाहणी व शारदानगर शैक्षणिक संकुलातील मंथन सभागृहात मुख्य कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होईल. या कार्यशाळेच्या माध्यातून उसाची उत्पादकता वाढवण्यासोबतच उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पन्न व उत्पादन मिळविण्यासाठी कृत्रीम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्रभावी वापर कसा करता येतो, याचे प्रात्यक्षिक पाहण्यासह सविस्तर माहिती मिळवण्यासाठी संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
यावेळी ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, प्रतापराव पवार, ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आदी उपस्थित असतील. राज्यातील सर्वच साखर कारखान्यांकडून अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा, असा ट्रस्टचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत अमेरिका आर्यलँड, इंग्लंड व दुबई येथील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.