चंदीगड : पंजाबमध्ये यावर्षी गेल्या हंगामाच्या तुलनेत उसाचा उतारा वाढल्याची नोंद झाली आहे. तर गेल्या काही वर्षांत उत्पादन क्षेत्र घटले आहे. साखर कारखान्यांकडून ऊस बिले देण्यास होणारा उशीर हे यामागील प्रमुख कारण आहे. या वर्षी उसाचे एकूण क्षेत्र ८८,००० हेक्टर (२,१७,३६० एकर) आहे. तर प्रती हेक्टर उत्पादन ८३५.९२ क्विंटल (३३८.४२ क्विंटल प्रती एकर) होते. २७ मार्चअखेर राज्यातील १६ साखर कारखान्यांपैकी सहकारी क्षेत्रातील नऊ आणि खासगी क्षेत्रातील सात कारखान्यांनी ५९६.७ लाख क्विंटल ऊसाचे गाळप करुन ५४.५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. त्याचा उतारा ९.३१ टक्के आहे. गेल्यावर्षी हा उतारा ९.०२ टक्के होता.
याबाबत इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या वर्षी उसाच्या प्रगत प्रजातीसाठी ३६० रुपये प्रती क्विंटल, मध्यम आणि नेहमीच्या प्रजातीसाठी अनुक्रमे ३५० आणि ३४५ रुपये प्रती क्विंटल ऊस दर आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ५० रुपये प्रती क्विंटल दर मिळणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्यानंतर सरकारने ऊसाच्या दरात वाढ केली होती. या हंगामात ऊस उत्पादकांना एकूण २१३०.६३ कोटी रुपयांची ऊस बिले अदा व्हायची आहेत. त्यापैकी २७ मार्चपर्यंत १२६३.५ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. उर्वरीत ८६७.१३ कोटी रुपये साखर कारखान्यांकडे थकीत आहेत. यासोबतच २०२०-२१ आणि २०१९-२० या हंगामातील अनुक्रमे ७.७१ कोटी रुपये आणि ३०.५७ कोटी रुपयांची थकबाकी कारखान्यांकडे आहे. एकूणच कारखान्यांकडे ९०० कोटी रुपयांची थकबाकी आहे.