पंजाबच्या ऊस उत्पादकांसाठी खुशखबर, मुख्यमंत्री मान यांनी जारी केले ७५ कोटी रुपये

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील जनतेला दिलेले आणखी एक आश्वासन पूर्ण केले आहे. सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत ७५ कोटी रुपये जारी केले आहेत. अर्थ विभागाने शुगरफेडला हे ७५ कोटी रुपये जारी केले आहेत. राज्यातील काही सरकारी कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ७ सप्टेंबरपर्यंत सर्व थकबाकी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. ऊस उत्पादकांच्या थकबाकीपोटी सरकारने २०० कोटी रुपये आधीच जारी केले आहेत. आता हे नवे पैसे जारी झाल्याने सरकारी कारखान्यांकडे कोणतीही ऊस थकबाकी नाही.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाब सरकारने बुधवारी सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केली. या महिन्यात विविध विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नव्हते. मात्र, लगेच वेतन मिळेल, अशी व्यवस्था केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उर्वरीत पैसेही लगेच जारी केले जातील. सरकारी तिजोरीत जेवढे पैसे आहेत, ते लोकांना उपलब्ध करून दिले जातील. राज्यात जीएसटी संकलन २३ टक्क्यांनी वाढले आहे अशी माहितीही मान यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here