चंदीगढ : राज्यात गेल्या तीन दिवसांत खराब हवामान आणि सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गव्हाच्या पिकाची पाहणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिले आहेत. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, राज्यात जवळपास ४ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे पावसाने नुकसान झाले आहे. पतियाळा, मोगा, होशियारपूर, गुरदासपूर, बर्नाला, संगरुर, फतेहगढ़ साहिब आणि लुधियाना जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले. पावसासोबत जोरदार वाऱ्यामुळे नुकसान आणखी वाढले होते. पाहणीचे नेतृत्व करणाऱ्या महसूल आणि कृषी विभागाकडून पुढील १० ते १५ दिवसांमध्ये अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात राज्यात ३४.९० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे. आणि हे पिक पुढील दोन ते तीन आठवड्यात कापणीसाठी तयार होईल. पावसामुळे यास उशीर होण्याची शक्यता आहे. राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने एक एप्रिलपासून धान्य खरेदीची तयारी केली आहे. मात्र, अशी अपेक्षा आहे की, धान्याची कापणी करून बाजारात त्याचा पुरवठा होण्यास आणखी एका आठवड्याचा कालावधी लागेल. रविवारी कृषी संशोधकांनी सांगितले की, जादा पाऊस कोसळल्यास पिकाचे नुकसान होऊ शकते. पावसाआधी राज्याच्या कृषी विभागाने यंदा बंपर गहू उत्पादन होईल, अशी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या एजन्सी आणि केंद्र सरकारच्या भारतीय अन्न महामंडळाला (FCI) १६५ लाख टन अनुमानीत उत्पादनापैकी जवळपास १३२ लाख टन धान्य मंडईत येण्याची अपेक्षा होती.
गेल्या हंगामात उशीरा झालेला पाऊस आणि तापमानात अचानक झालेली वाढ यामुळे जवळपास १३ टक्के गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले होते. तेव्हा पिक परिपक्व होण्याच्या अवस्थेत होते. कृषी संचालक गुरविंदर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, आता पावसानंतर जर कडक ऊन पडले तर पिकाचा धोका कमी होईल. ते म्हणाले की, सूर्यप्रकाशामुळे पिकाची उत्पादकता वाढण्यास मदत मिळेल. राज्याच्या हवामान विभागाने २३ आणि २४ मार्च रोजी आणखी एकदा पावसाचा अंदाज वर्तविला आहेत. त्यातून पिकाचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.