चंदीगढ : जिल्हा प्रशासनाने बुधवारी धुरीतील खासगी साखर कारखान्याचा लिलाव स्थगित केला. कारखाना व्यवस्थापनाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ७.८२ कोटी रुपयांची थकबाकी देण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. प्रशासनातील अधिकारी सकाळी लिलावासाठी पोहोचले, तेव्हा तेथे अबकारी आणि कर विभागाचे अधिकारीही आले. त्यांनी दावा केला की, कारखान्याकडे जवळपास ४६ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. यादरम्यान शेतकरीही कारखान्याच्या बाहेर जमा झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना आत जावू दिले नाही.
हिंदूस्थान टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस संघर्ष समितीचे नेते अवतार सिंह यांनी सांगितले की, प्रशासनाने लिलावास उशीर व्हावा यासाठी जाणूनबुजून अबकारी आणि कर विभागाला समोर आणले आहे. त्यांनी विचारणा केली, की जर अधिकारी दावा करीत असतील की, करांच्या थकबाकी १९४७ पासून आहे, तर मग हे अधिकारी यापू्र्वी काय करत होते? धुरी विभागीय दंडाधिकारी अमित गुप्ता म्हणाले की, मी अद्याप कारखान्यामध्ये आहे. या मुद्यावर प्रशासनाशी चर्चा करीत आहे.