लुधियाना : इथेनॉल मिश्रीत (ई २०) पेट्रोल पंपांच्या संख्येमध्ये पंजाब राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती खासदार संजीव अरोरा यांनी दिली. अरोरा यांना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेतील प्रश्नोत्तरावेळी दिलेल्या लेखी उत्तरातून ही स्थिती समोर आली आहे.
सचकहूँ वेबसाइटमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, खासदार अरोरा यांनी देशातील ई २० पेट्रोल आउटलेट्सबाबत प्रश्न विचारला होता. देशातील E२० पेट्रोल रिटेल आउटलेटची संख्या आणि इथेनॉल मिश्रणाची सद्यस्थिती विचारण्यात आली होती. यावर उत्तर देताना मंत्री तेली म्हणाले की, इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमांतर्गत, उपलब्धतेच्या आधारावर देशातील सर्व राज्यांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री केली जात आहे. इथेनॉल पुरवठा वर्ष २०२१-२२ साठी १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य भारताने आधीच गाठले आहे. सध्या २३ जुलै २०२३ पर्यंत एकूण मिश्रणाची टक्केवारी ११.७७ टक्के आहे. इंधन वितरण कंपन्यांनी देशभरातील १६०० हून अधिक रिटेल आउटलेटमध्ये ई20 (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलची विक्री सुरू केली आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात २१८ तर दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशमध्ये १८० पेट्रोल पंपांवर २० टक्के इथेनॉलमिश्रीत पेट्रोल विक्री केली जाते. पंजाबमध्ये १६६ पंपांवर विक्री केली जात असून या क्रमवारीत राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे.