चंदीगढ : गेल्यावेळी एप्रिल महिन्यात पिक कापणीच्या दरम्यान आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या उत्पादनात जवळपास २० टक्क्यांची घट झाली होती. त्यामुळे पंजाबमधील शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर भाताच्या कापणीनंतर गव्हाच्या पेरणीस सुरुवात केली आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारपर्यंत राज्यात गव्हाची ४५ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. तर काही जिल्ह्यांत ही पेरणी ७५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
गेल्या वर्षी पंजाबमध्ये या कालावधीत ३० टक्के गव्हाची पेरणी झाली नव्हती. पंजाबमध्ये जवळपास ३५ लाख हेक्टर (८६.४५ लाख एकर) क्षेत्रात गव्हाचे पिक घेतले जाते. आणि यावेळी राज्यात रब्बी हंगामात तेलबियांचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गव्हाचे लागवड क्षेत्र कमी होऊ शकते. गहू पेरणीचा आदर्श कालावधी १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान आहे. गेल्यावर्षी हा कालावधी २० ते २५ नोव्हेंबरपर्यंत पुढे गेला होता.
यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात गव्हाचे पेरणी केली आहे. आतापर्यंत ४५ टक्के गहू आणि रब्बी तेलबीयांची ७२ टक्के लागवड पूर्ण झाली आहे. पटियालामध्ये ९ नोव्हेंबरपर्यंत गव्हाची पेरणा ७५ टक्के झाली आहे. त्यापाठोपाठ फतेहगढ साहिब (७०%), कपूरथला (६९%) , रुपनगर (६८%), अमृतसर (६७%), नवांशहर (६५%), संगरुर (६३%) आणि मोहाली (६०%) यांसह इतर अनेक जिल्ह्यांत लागवड झाली आहे. याशिवाय गुरदासपुर, लुधियाना आणि मनसामध्येही अनुक्रमे ५५%, ४८% आणि ४२% पेरणी झाली आहे. फिरोजपुर, भठिंडा आणि पठानकोटमध्ये हा आकडा ३५-३५ टक्के इतका आहे. जालंधरमध्ये ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण केली आहे. तर बरनाला, होशियारपुर, तरनतारन आणि मोगा जिल्ह्यात हे प्रमाण ३० टक्के एवढे आहे. मुक्तसर साहेब आणि फरीदकोटमध्ये २०-२० टक्के पेरण्या झाल्या आहेत. तर फाजिल्का १५ टक्के पेरणी करुन सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे.